श्रीरामगड देवस्थानला क तीर्थ क्षेत्राचा दर्जा मिळावा

Foto
शेलूद येथील भाविक भक्तांची मागणी, हजारोंची रोज हजेरी

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) 
तालुक्यातील शेलूद येथील श्रीराम चरण प्रकट भूमी श्रीरामगड देवस्थानला क वर्ग तीर्थ क्षेत्राचा दर्जा मिळावा. अशी मागणी भाविक भक्तांतून जोर धरत आहे. मराठवाड्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या श्रीरामगड येथे श्रीराम मंदिर व विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. 

अमावस्या, पौर्णिमा, एकादशी व इतर धार्मिक दिवशी येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. नवसाला पावणारे श्रीरामगड अशी या क्षेत्राची ख्याती असून छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव जिल्ह्यातून भाविकांची रोज हजेरी असते. मात्र, भाविकांची वाढती संख्या पाहता येथे मूलभूत सुविधा अपुऱ्या पडत आहेत. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, पेवब्लॉक रस्ता, सभामंडप, वाहनतळ यांची कमतरता आहे. सध्या देवस्थान समिती व देणगीदारांच्या सहकार्यातून काम सुरू आहे, परंतु शासनाचा निधी मिळाल्यास मोठ्या प्रमाणावर विकास होऊ शकतो. 

क वर्ग तीर्थ क्षेत्राचा दर्जा मिळाल्यास शासनाकडून विकासकामांसाठी निधी उपलब्ध होईल. भाविकांसाठी सोयीसुविधा निर्माण होतील व पर्यटनाच्या दृष्टीनेही या क्षेत्राचा विकास होईल. त्यामुळे स्थानिकांना रोजगारही मिळेल. श्रीरामगड देवस्थान समितीचे अध्यक्ष विक्रम काकडे म्हणाले, श्रीरामगड ही प्रभू श्रीरामांची चरण प्रकट भूमी आहे. 

येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाची श्रद्धा आहे. क दर्जा मिळाल्यास गडावर दर्शन मंडप, भक्त निवास, पायऱ्या, संरक्षण भिंत अशी कामे मार्गी लागतील. शासनाने भाविकांच्या भावनेचा विचार करून तात्काळ क दर्जा द्यावा, हीच आमची मागणी आहे. या मागणीसाठी परिसरातील सरपंच, ग्रामस्थ व हजारो भाविकांनी पाठिंबा दर्शवला आहे. लवकरच शिष्टमंडळ पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे समितीने सांगितले.